रावेर येथे सेवानिवृत्त शिक्षकांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
रावेर/जळगाव || १० ऑगस्ट २०२५ || {हमीद तडवी}:- महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे तालुका स्तरीय स्नेहसंमेलनाचे आयोजन रावेर येथील माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष भगवान वाघे, जिल्हा चिटणीस अविनाश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष वाघे यांनी “सेवानिवृत्तांची सेवा हीच खरी सेवा” असल्याचे सांगून, त्यांच्या अडचणी सोडवणे व हक्क मिळवून देणे हीच खरी पावती असल्याचे नमूद केले. तर जिल्हा सरचिटणीस मोरे यांनी समस्यांची जाण ठेवून निरंतर पाठपुरावा करणाऱ्यालाच खऱ्या अर्थाने सेवाकार्याचा आनंद मिळतो, असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष हर्षवर्धन तायडे यांनी संस्थापक व राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांच्या संघटना स्थापनेमागील उद्देश मांडला. संघटनेमुळे सेवानिवृत्तांना गट विमा, फंड, उपदान, अंशदान आदी संदर्भातील मनस्ताप कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त हबीब तडवी, मोहम्मद तडवी, दिलीप पाटील, सायबू तडवी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ सभासद सुभान तडवी, रा. सि. महाजन, ज्ञानेश्वर पाटील, हुसेन तडवी, हारून जमादार, किशोर चौधरी, पुंडलिक फिरके, मोहन फिरके, सैयद अफजल यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन हबीब तडवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप पाटील, संतोष बाविस्कर, मिलिंद सूरदास, छगनलाल महाजन, गणेश महाजन यांनी परिश्रम घेतले.
