नगरपरिषद निवडणुकांसाठी नवापूर येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी….
नंदुरबार || दिनांक 2७ नोव्हेंबर 2025 || (फिरोज खान) :- नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.
या तयारीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेची पाहणी आज मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केली.
नवापूर तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम येथे मतदानासाठी प्राप्त झालेली मतदार यंत्रे (EVM–VVPAT) मतदान सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून यंत्रांची सुरक्षितता, नोंदी, शासकीय प्रोटोकॉल यांची सविस्तर माहिती घेतली.
पाहणीदरम्यान डॉ. सेठी यांनी मतदान सुरक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याच्या, तसेच फायर एक्झ्टिंग्विशर बसविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मतदान यंत्र सुरक्षा कक्ष उच्च सुरक्षा मानकांनुसार असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषद निवडणूक 2025 साठी उभारण्यात आलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्ष आणि मतमोजणी केंद्राचीही त्यांनी स्वतंत्रपणे पाहणी केली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, निष्पक्ष व काटेकोरपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असा संदेश त्यांनी दिला.
पाहणीदरम्यान नवापूर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, निवासी नायब तहसीलदार तसेच सर्व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाकडून निवडणूक तयारीचा वेग वाढला असून, मतदारांमध्येही या बाबत उत्सुकता आहे.
