सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत माजविण्याचा प्रयत्न;आरोपी ताब्यात….

सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत माजविण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात, नंदुरबार शहर पोलीस गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई

नंदुरबार || दि. ३ ऑगस्ट २०२६ || (फिरोज खान)-: नंदुरबार शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहर पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत.

या मोहिमेदरम्यान दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.०० वाजण्याच्या सुमारास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, हलवाई गल्ली परिसरात एक इसम हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

या प्रकरणी कासीम मुस्ताक हलवाई (वय २७ वर्षे, रा. बोडगाव, ता. जि. नंदुरबार) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह कलम १३५ तसेच भारतीय हत्यार अधिनियम, १९५९ चे कलम ४/२५ अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील (प्रभारी अधिकारी, नंदुरबार शहर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस हवालदार जगदीश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, राजेंद्र कटके, ललित गवळी, अमित भरवाड, राहुल राठोड आणि पोलीस कर्मचारी निंबा वाघमोडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, नंदुरबार शहरात विना परवानगी वास्तव्य करणारे हद्दपार आरोपी तसेच चोरीची मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्धही महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन..

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा समाजात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रांचे प्रदर्शन करणे हा गंभीर आणि कायद्याने शिक्षापात्र गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सार्वजनिक ठिकाणी कोणीही व्यक्ती बेकायदेशीररीत्या घातक शस्त्र बाळगत असल्याचे अथवा सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांनी केले आहे.

Call Us