पावसाळी आपत्ती काळात सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे; जिल्हाधिकारी धनंजय गोगटे…
नंदुरबार || दिनांक 26 ऑगस्ट || (फिरोज खान)-: गेल्या दोन दिवसांपासून सतंतधार पावसामुळे जिल्ह्यात कुठेही आपत्ती येवू शकते, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे व सर्वांनी मुख्यालयी थांबावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार ॲङ के. सी. पाडवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल बोरसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सी.के. ठाकरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना वळवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोगटे म्हणाले की, येणारे तीन ते चार दिवस हवामान खात्याने जिल्ह्यास रेड अलर्ट दिला असल्यामुळे सर्वांनी सतर्क रहावे, जिल्ह्यातील सर्व पाझर तलाव यांची पाहणी करुन आवश्यक ती दुरस्ती करावी. नगरपालिका क्षेत्रात नाले साफ-सफाई करावी. तसेच जिर्ण झाडे, इमारत पडण्याच्या स्थितीत असल्यास त्यावर त्वरीत आवश्यक ती कार्यवाही करावी. नंदुरबार व तळोदा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रम शाळेस संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत भेट द्यावी ज्या आश्रम शाळेत पाणी शिरत असेल अशा शाळांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यवाही करावी. सर्व विभागांनी त्यांच्या कार्य क्षेत्रातील कामांचा सर्वे करुन जी कामे दुरुस्तीची असतील ती त्वरीत करुन घ्यावीत. आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या काळात व आपत्ती काळानंतर संबंधित प्रत्येक विभागाने नियोजनाप्रमाणे तत्काळ प्रतिसाद द्यावा. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारपणावर वेळीच औषधोपचार करण्यासाठी आवश्यक त्या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवावा. सर्व मंडळ क्षेत्रातील धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रणा तपासून घ्याव्यात.
यावेळी झालेल्या चर्चेत खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार ॲड. के.सी. पाडवी, यांनीही सहभाग घेवून जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या आपत्तीबाबत माहिती घेतली.
उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे यांनी यावेळी सांगितले की पाऊस सुरु असतांना जीवतहानी, पशुहानी झाल्यास, रस्त्यांचा संपर्क तुटल्यास, घरात व शेतात पाणी शिरणे, आरोग्य विषयक आपत्ती, शाळांची पत्रे उडणे, जिर्ण इमारती कोसळणे, संरक्षण भिंती तुटणे, वीज तारा पडणे, झाडे पडणे यासारख्या आपत्तीजन्य घटना घडल्यास संबंधित विभागांनी त्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी असे सांगितले.