दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी,८६ लाख २६ हजार 100/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
कोल्हापुर : दि.१० सप्टेंबर :-
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हयातील एकूण 13 घरफोडी व 01 मोटर सायकल चोरी असे गुन्हे उघड. 1 किलो 200 ग्रॅम सोने, 1 किलो 430 ग्रॅम चांदी व इतर साहित्य असा एकूण 86,26,100/- रुपये किंमतीचा
मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित साो यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडत असलेले घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक,कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी शाखेकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची पथके तयार करून कोल्हापूर जिल्हयामध्ये मालाविरुध्दचे गुन्हयासह दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवून गुन्हा घडले ठिकाणची भौगोलीक परिस्थीती, गुन्हा करणेची पध्दत याची माहिती घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथके हे माहिती घेत असताना अज्ञात चोरटयानी ग्रामीण भागामध्ये गावाचे बाहेरील बाजूस रोडलगत असलेली बंद स्थितीत असणारी घरे लक्ष्य करुन सदरच्या घरामध्ये चो-या केलेचे निदर्शनास आले.
निष्पन्न झालेले माहितीचे आधारे तपास पथकाने संपुर्ण कोल्हापूर जिल्हयामध्ये दिवसा घडलेले घरफोडी चोरीचे गुन्ह्यांचा एकत्रितरित्या तपास सुरु केला.
तपासामध्ये गुन्हा घडलेली ठिकाणे, गुन्हा करणेचे पध्दतीसह इतर तांत्रीकदृष्टया तपास करीत असताना कोडोली पोलीस ठाणे, गु.र.नं. 179/2024, भा.द.वि.स. क. 454,380 प्रमाणे दाखल गुन्हा हा विक्रम कित्तुरकर, रा. हालशी, बेळगांव याने व त्याचे साथीदारांने मिळून केला असल्याचे तपास पथकाने निष्पन्न केले.
सदरचा आरोपी हा नमुद गुन्ह्यातील चोरलेले दागिने विक्री करणेकरीता मुरगूड नाका ते सिध्दनेर्ली जाणारे रोडवर असले रिध्दी- सिध्दी मंगल कार्यालयाजवळ येणार असलेबाबत गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली.
मिळाले माहितीचे आधारे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, प्रविण पाटील, समीर कांबळे, दिपक घोरपडे अशा पथकाने दि. 19.08.2024 रोजी मुरगूड नाका ते सिध्दनेर्ली जाणारे रोडवर असले रिध्दी-सिध्दी मंगल कार्यालयासमोर सापळा लावून आरोपी नामे विक्रम उर्फ राजू बाळू कित्तुरकर, व.व.31, रा. इंदिरानगर हालशी, ता. खानापूर, जि. बेळगांव, राज्य-कर्नाटक यास त्याचे कब्जातील सोन्या-चांदीचे दागिने व मोटर सायकल असा एकूण 88,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह पकडले.
वरिष्ठांचे आदेशान्वये कोडोली पोलीस ठाणे, गु.र.नं. 179/2024, भा.द.वि.स.क.454,380 प्रमाणे दाखल गुन्हा तपासाकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे घेवून आरोपी विक्रम उर्फ राजू बाळू कित्तुरकर यास नमुद गुन्ह्यात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपास केला.
तपासात तो व त्याचा साथीदार महादेव नारायण धामणीकर, रा. हालशी, ता. खानापूर, जि. बेळगांव असे दोघानी मिळुन गेले आठ महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात दिवसा घरफोडी-चोरीचे गुन्हे केलेचे निष्पन्न झाले. आरोपी महादेव नारायण धामणीकर रा. हालशी, ता. खानापूर, जि. बेळगांव यास कर्नाटक राज्यात अटक केली होती.
त्याचा देखील ताबा घेवून त्यास नमुद गुन्ह्यात अटक करून दोन्ही आरोपींकडे एकत्रितरित्या तपास केला.
त्यामध्ये नमुद आरोपी हे हालशी, ता. खानापूर, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक येथील राहणारे असून आरोपी महादेव नारायण धामणीकर हा दिवसा घरफोडी चोरी करणारा कर्नाटक राज्यातील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे.
ते दोघेजण कर्नाटक येथून एस.टी. बसने महाराष्ट्र राज्यात येवून मोटर सायकल चोरुन त्याव्दारे कोल्हापूर जिल्ह्यात चोरी करुन परत मोटर सायकल महाराष्ट्र राज्याचे सीमेलगत सोडून एस.टी. बसने जात होते व गुन्हे केलेनंतर चोरीचे दागिने वाटून घेत होते. आरोपी विक्रम उर्फ राजू कित्तुरकर याचेकडुन चोरीचे व त्याचे वाटणीस आलेले दागिने व रोख रक्कम तसेच फेडरल बँक शाखा खानापूर येथे चोरीचे तारण ठेवलेले 233 ग्रॅम सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे आरोपी महादेव धामणीकर याचेकडून 694 ग्रॅम सोन्याचे व 450 ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण 1200 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1430 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्हा करणेकरीता वापरलेल्या दोन मोटर सायकली व इतर साहित्य त्याचप्रमाणे बेळगांवी ग्रामीण पोलीस ठाणे यांचेकडे व मुथुट फिनकॉर्प खानापूर यांचेकडील दागिने असा एकूण 86,26,100/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केला आहे.
तसेच आरोपी विक्रम उर्फ राजू कित्तुरकर याने मुथुट फिनकॉर्प शाखा खानापूर, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक येथे चोरीचे त्याचे नांवे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने जप्त करणेची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, जालिंदर जाधव, शेष मोरे पोलीस अमंलदार हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, समीर कांबळे, दिपक घोरपडे, संजय पडवळ, प्रशांत कांबळे, राजेश राठोड, संजय कुंभार, अशोक पवार, प्रविण पाटील, सागर माने, राजू कांबळे, प्रकाश पाटील, सोमराज पाटील, अमित सर्जे, सुशिल पाटील, बालाजी पाटील, महेश आंबी, संजय देसाई, कृष्णात पिंगळे, तुकाराम राजीगरे, महेश गवळी, हंबीरराव अतिग्रे, यशवंत कुंभार, राजेंद्र वरंडेकर व राजू येडगे यांनी केली आहे.
तसेच आरोपींना मा. हुजूर कोर्टातील कामकाजावेळी सहा. सरकारी अभियोक्ता श्रीमती संज्योती म्हामूलकर व पोलीस अमंलदार मधुकर बसरे यांनी योग्य ती मदत केलेली आहे.