नितेश राणेंची हिंदूंना शपथ…!
मुंबई || दि.१२सप्टेंबर २०२४ || भाजपचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड खेळलं आहे. नवी मुंबईतील उलवे येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळात नितेश राणे यांनी हिंदूंना आर्थिक बळकटीकरणाची शपथ दिली.
पाकिस्तान आणि बांगलादेशात आपल्याला खिजगणतीत धरलं जात नाही. मग आपणही आपलं बळकटीकरण केलं पाहिजे. कुणाच्या भरवश्यावर बसता कामा नये. आपली एकजूट असेल तर आपण या देशाला नव्या उंचावर नेऊ शकतो, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे हे उलवे येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आलं. नितेश राणे यांनी गणरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना हिंदूंनी हिंदूंसोबतच आर्थिक व्यवहार करण्याचं आवाहन केलं.
तशी शपथच त्यांनी हिंदुंना दिली. उलवे हा परिसर हिंदुंचाच राहिला पाहिजे, असं सांगतानाच उलवेत काही झालं तर मला बोलवा मी अवघ्या 10 मिनिटात येईल, असंही नितेश राणे म्हणाले.
आधारकार्ड तपासा…
कुणालाही तुमची घरे विकू नका. घरे विकताना संबंधितांचं आधार कार्ड तपासा. कारण खोट्या नावाने व्यवहार होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नावे पाहूनच व्यवहार करा. सक्षम करायचं असेल तर हिंदूंनाच करा, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. हिंदूंची एकजूट दिसू द्या..
यावेळी नितेश राणे यांनी मुस्लिमांशी कोणतेही व्यवहार न करण्याचं आवाहनही केलं. कोणत्याही धमक्यांना घाबरू नका. हिंदूंची एकजूट दिसली पाहिजे. तुमच्यातही कडवटपणा आलाच पाहिजे. त्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, असं त्यांनी म्हटलं आहे.