आपल्या संस्कृतीतील प्रत्येक प्रथा परंपरे मागे वैज्ञानिक कारण आहे; रोहिणी खडसे..
मुक्ताईनगर || दि.११ ऑक्टोंबर २०२४ || (मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी)-: विजयादशमीला शौर्य आणि विजयाचे प्रतिक मानले जाते याला अनुसरून शस्त्र आणि आपल्या दैनंदिन अवजारांचे पुजन करण्याची आपल्या संस्कृतीत परंपरा आहे.
त्या अनुषंगाने मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कै ग सु वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थेच्या चेअरमन तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते शस्त्र पुजन करण्यात आले.
तसेच त्यांच्या हस्ते डिजिटल क्लास रुम आणि जे.ई. स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. प्लांट चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ सि एस चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे म्हणाल्या दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला. याच दिवशी दुर्गामातेने ९ दिवसाच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला आणि वाईट प्रवृत्ती पासुन समाजाला मुक्त केले अशी पौराणिक कथा आहे यामुळे दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते.
त्यामुळे विजयादशमीला शस्त्रांचे आणि अवजारांचे पुजन करण्याची आपली प्राचिन प्रथा आहे. या प्रथेतून आपली परंपरा जोपासली जाते त्याचबरोबर आपल्या दैनंदिन कामात उपयोगी येणाऱ्या आपल्या भाकरी देणाऱ्या अवजारांची स्वछता करून त्यांची निगा राखली जाते त्यामुळे हि अवजारे अधिक कार्यक्षम बनतात
अवजारे जरी निर्जीव असले तरी त्यांचे पुजन करून एकप्रकारे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते परंपरेच्या जपणुकीतून दैनंदिन उपयोगी अवजारांची निगा स्वछता राखण्याचे आपल्याला यातून शिकवणूक मिळते आपल्या संस्कृतीतील प्रत्येक प्रथा परंपरे मागे काही तरी वैज्ञानिक कारण असल्याचे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या आज संस्थेत डिजिटल क्लास रुम आणि आर.ओ.प्लांट चे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणा बरोबर इतर सुविधा उपलब्ध व्हाव्या त्यातून विद्यार्थ्यांचा विकास घडावा असा आमच्या संस्थेचा नेहमी प्रयत्न असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले याप्रसंगी संस्थेचे संचालक आर .पि. ब-हाटे सर, आर एम खाचणे, पुरुषोत्तम महाजन, महेश पाटिल, प्राचार्य सुजित पाटिल, प्राचार्य नितीन भोंबे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते