मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत तसेच
मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री बंद राहणार – जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
नंदुरबार || दि. २५ ऑक्टोंबर २०२४ || (फिरोज खान) :- विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक असलेल्या मतदारसंघाच्या हद्दीतील मद्यविक्री १८ ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आणि मतमोजणीच्या दिवशी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत, याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.
लोकप्रतिनिधत्व अधिनियम, 1951 कलम 135 (सी) अन्वये तसेच महाराष्ट्र देशी दारू नियम, महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.), महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडीची झाडे नियम, विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.
###बंदची तारीख, दिवस आणि वेळ या क्रमाने..
१८ नोव्हेंबर २०२४ ला (मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर) सायंकाळी ६ वाजेपासून. १९ नोव्हेंबर २०२४, (मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस), २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस मतदान संपेपर्यंत.
मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४, रोजी मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील.
संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी याची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावाणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल व ते धारण करत असलेला परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आदेशात नमूद केले आहे.