अवैध धंद्यांविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग: पाचोऱ्यात पत्रकारांवर खंडणीचा खोटा गुन्हा!

अवैध धंद्यांविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग: पाचोऱ्यात पत्रकारांवर खंडणीचा खोटा गुन्हा!

##महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक, राज्यभर तीव्र आंदोलनाची घोषणा!##

जळगाव/पाचोरा दि.२३ जुन २०२५ {प्रतिनिधी} -: पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पत्रकारांवर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरात पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा व अन्य तीन पत्रकारांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत कलम 308(2), 118(1), 115(2), 351(2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खोट्या गुन्ह्यामागे पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि जुगार माफिया शेखर उर्फ भोला पाटील यांच्यातील कथित मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे संबंधित तीन पत्रकार हे त्या घटनेच्या ठिकाणी उपस्थितही नव्हते, असे स्पष्ट करून या गुन्ह्याचे राजकीय उद्देशाने प्रेरित असलेले स्वरूप उघड झाल्याचे पत्रकार संघाचे म्हणणे आहे.

ज्यांनी अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला, त्यांच्यावरच खोटे गुन्हे!

पाचोरा परिसरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या जुगार अड्डे, देशी-विदेशी दारू विक्री व इतर अनेक अवैध धंद्यांविरोधात किशोर रायसाकडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आवाज उठवला होता. याच दरम्यान, जुगार माफिया शेखर पाटील उर्फ भोला याने पत्रकार राकेश सुतार यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावर पाचोरा पोलीसांनी तात्पुरती कारवाई केल्याचा देखावा केला. मात्र, त्यानंतर संबंधित गुन्हेगाराला पोलिसांचे संरक्षण मिळू लागले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पत्रकार संरक्षण कायदा वाऱ्यावर – पोलीसच गुन्हेगारांच्या बाजूने?

पत्रकार संरक्षण कायद्याची पूर्णतः पायमल्ली करून पोलीसच गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शेखर पाटीलसोबत आर्थिक आणि सख्य संबंध निर्माण झाले आहेत, असा ठपका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने ठेवला आहे.

राज्यभर आंदोलनाची हाक – अर्धनग्न निदर्शने होणार

या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. उद्या दिनांक २३ जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार असून, संपूर्ण राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर पत्रकार अर्धनग्न आंदोलन करतील, अशी घोषणा पत्रकार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

प्राथमिक मागण्या पुढीलप्रमाणे:

  1. किशोर रायसाकडा व अन्य तीन पत्रकारांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
  2. पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तात्काळ निलंबित करून गडचिरोली येथे बदली करावी.
  3. अशोक पवार यांनी त्यांच्या सेवाकाळातजमा केलेल्या अवैध संपत्तीची ईडीमार्फत (Enforcement Directorate) चौकशी व्हावी.
  4. शेखर पाटील याच्यावर कठोर कारवाई करून त्याच्या गुन्हेगारी इतिहासाचा सखोल तपास करावा.

“भगवान के घर देर है, अंधेर नहीं” – किशोर रायसाकडा यांचा विश्वास!

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा म्हणाले,
“आमचा न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. आम्ही कोणत्याही खोट्या गुन्ह्याला घाबरणार नाही. पाचोऱ्यातील अवैध धंद्यांविरोधात आमची लढाई अधिक जोमाने सुरू राहील. ही केवळ आमची लढाई नसून संपूर्ण पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.”

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तीव्र समर्थन – पत्रकारांचा एकत्रित एल्गार!

या संपूर्ण प्रकारावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, उपाध्यक्ष अशोक देडे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, कार्याध्यक्ष निलेश सोमानी, संपर्कप्रमुख वैभव स्वामी, समन्वयक नितीन शिंदे आदींनी एकत्रितपणे निषेध नोंदवत, तातडीने योग्य तो निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

जनतेतही संताप – “अशोक पवार हटाव, भयमुक्त पाचोरा करा”

पाचोऱ्यातील नागरिकांमध्येही या प्रकरणावरून संतापाची भावना आहे. स्थानिक पातळीवर “अशोक पवार हटाव – भयमुक्त पाचोरा करा” अशी मागणी जोर धरू लागली असून, पाचोऱ्यात लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांसोबत अनेक सामाजिक कार्यकर्तेही उभे राहत आहेत.

हे केवळ पत्रकारांच्या हक्कांसाठीच नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या न्यायासाठीचे युद्ध आहे! राज्य शासनाने तातडीने कारवाई न केल्यास पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करतील, हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us