गावठी बनावटीची पिस्टल व काडतूस बाळगणाऱ्या संशयीतांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
नंदुरबार दि. ०२ ऑगस्ट २०२५ (फिरोज खान) :-३० हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतूस जप्त केली आहे. दिनांक ०१/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमी मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावातील इसम नामे रुबाबसिंग पावरा हा बेकायदेशिररित्या गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व जिवंत काडतूस कब्जात बाळगुन आहे.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदर बातमीची हकीगत आपल्या पथकास कळवून बातमीची खात्री करून कायदेशिर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावात जावून इसम नामे रुबाबसिंग पावरा याची माहीती काढून त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रुबाबसिंग वनसिंग पावरा वय ३० वर्षे राहणार-तलावडी ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व काडतूस बाबत विचारून घराची घरझडती घेतली असता त्याच्या राहत्या घरातून ३० हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतूस मिळून आले.
सदर पिस्टल व काडतूस कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आले आहेत. सदर इसम नामे रुबाबसिंग वनसिंग पावरा वय ३० वर्षे राहणार- तलावडी ता. शहादा जि. नंदुरबार व सदर इसमास बनावट पिस्टल देणारा इसम नामे सजन खरडे रा. अंबापुर ता. शहादा जि. नंदुरबार यांचेविरुध्द म्हसावद पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार मुकेश तावडे, जितेंद्र पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे पोलीस नाईक विकास कापुरे पोलीस शिपाई अभय राजपुत यांचे पथकाने केली आहे.

