मोहाडी नगर पोलिसांचा मद्य तस्करांवर दणका विनापरवाना विदेशी दारूचा तब्बल 1 कोटी 2 लाखांचा साठा जप्त;दारू बनावट की मूळ? कंपनीच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशीची मागणी.
धुळे | दि. १९ जानेवारी २०२६ | (समीर शेख)-: मोहाडी नगर पोलिसांनी विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या मद्य तस्करांवर मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 2 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणामुळे अवैध दारू वाहतुकीच्या साखळीबरोबरच संबंधित कंपनीची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दि. १८ जानेवारी २०२६ रोजी मोहाडी नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ट्रक क्रमांक MH 23 AU 7042 हा मालेगावहून धुळेकडे विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करीत आहे.
सदर माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
संध्याकाळी सुमारे 07.30 वाजता लळींग टोल नाक्याच्या पुढे, जय मल्हार चहाच्या टपरीजवळ संशयित ट्रक उभा असल्याचे आढळून आले. ट्रक चालकाने आपले नाव मुकेश नाथू प्रजापती (वय 38, रा. धानी कचावदा, ता. धरमपुरी, जि. धार, मध्यप्रदेश) असे सांगितले.
मात्र वाहनातील मालाबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने ट्रक पोलीस स्टेशन आवारात आणून पंचनामा करण्यात आला.
झडतीदरम्यान ट्रकमधून “GOA Whisky” नावाच्या विदेशी दारूचे 1500 खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 48 बॉटल (180 मिली) असून प्रत्येकी बॉटलची किंमत 128 रुपये आहे. या दारूची एकूण किंमत 92 लाख 16 हजार रुपये इतकी आहे. याशिवाय टाटा LPT 3118 कंपनीचा ट्रक (किंमत अंदाजे 10 लाख रुपये) जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत कलम 65(ई), 65(अ), 83, 108 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
🔴 महत्त्वाचा मुद्दा – कंपनी संशयाच्या भोवऱ्यात
या कारवाईनंतर “GOA Whisky” या विदेशी दारूच्या कंपनीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही दारू मूळ (Original) आहे की बनावट (Duplicate) पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे, तसेच ही कंपनी कोणाची आहे, कुठे उत्पादन होते, वितरणाची साखळी कशी आहे, याबाबत सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी केली जात आहे. यामुळे दारू तस्करीमागील मोठे रॅकेट आणि कंपनीचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील, पोउपनि. नितीन करंडे, पोहेकॉ. सचिन वाघ, पोकॉ. जितेंद्र सैंदाणे, पोहेकॉ. श्रीकांत निकुंभे, पोकॉ. चेतन झोळेकर, पोकॉ. पवन थोरात यांच्या पथकाने केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
