IMA नंदुरबारच्यावतीने स्वच्छता दूतांचा सन्मान; आरोग्य व दंत तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले…

IMA नंदुरबारच्यावतीने स्वच्छता दूतांचा सन्मान; आरोग्य व दंत तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले…

नंदुरबार || दि. १७ ऑकटोबर २०२५ || (फिरोज खान) :- नंदुरबार शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आपल्या ‘अदृश्य हिरों’प्रती कृतज्ञतेची दिवाळी भेट भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) नंदुरबार शाखेच्या वतीने, 17 ऑक्टोबर रोजी नंदुरबार नगरपालिका कार्यालयात स्वच्छता कामगारांसाठी (स्वच्छता दूत) सर्वसाधारण आरोग्य व दंत तपासणी आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ही मोहीम ही एक कृतज्ञतेची भावनात्मक अभिव्यक्ती होती – त्या सर्व स्वच्छता कामगारांसाठी जे आपल्या शहराच्या आरोग्यासाठी, स्वच्छतेसाठी आणि सौंदर्यासाठी न थकता सेवा देत आहेत.

या शिबिरात मुख्याधिकारी राहुल वाघ, IMA अध्यक्ष डॉ. राजेश वसावे, सचिव डॉ. स्वगात शाह व कोषाध्यक्ष डॉ. गणेश पाकळे उपस्थित होते.

🩺 शिबिराचे ठळक मुद्दे_ एकूण ५६ स्वच्छता कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.रक्त तपासण्या, तसेच अ‍ॅनिमिया (रक्ताल्पता), उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली.

यासाठी डॉ. संगीता पाटील मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व कामगारांना हेल्थ व हायजिन किट देण्यात आली – यात टूथब्रश, टूथपेस्ट, हिवाळ्यासाठी मॉइश्चरायझर आणि हातमोजे यांचा समावेश होता.

डॉ. अश्विन पटेल सर यांनी काही गरजू कामगारांना चादरी (ब्लॅंकेट्स) भेट दिल्या. जनजागृती व प्रेरणादायी भाषणे: IMA अध्यक्ष डॉ. राजेश वसावे यांनी स्वच्छता दूतांच्या सामाजिक योगदानाचे महत्व विषद करत त्यांच्या कार्याबद्दल समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

मानसोपचारतज्ञ डॉ. दिनेश वाळवी यांनी मानसिक आजारावरील कलंक व व्यसनमुक्ती या विषयांवर मार्गदर्शन केले. दंतविशेषज्ञ डॉ. आकाश पटेल यांनी तोंडाच्या स्वच्छतेबद्दल, योग्य दात घासण्याची पद्धत शिकवली तसेच तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या मुखकॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण केली.

शिबिरातील विशेष उपस्थिती_ मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी IMA च्या या उपक्रमाचे कौतुक करून, भविष्यात अशा उपक्रमांसाठी नागरिक प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
IMA सचिव डॉ. स्वगात शाह यांनी आभार प्रदर्शन करत नगरपालिका प्रशासनाचे, सहभागी डॉक्टरांचे व सर्व स्वच्छता कामगारांचे मन:पूर्वक आभार मानले.

उपस्थित डॉक्टर_ डॉ. सुनील पाटील – अस्थिरोग तज्ज्ञ
डॉ. सचिन खलाने – बालरोग तज्ज्ञ, डॉ. भारत चौधरी – बालरोग तज्ज्ञ, डॉ. प्रीती सुर्यवंशी – स्त्रीरोग तज्ज्ञ,
डॉ. अश्विन पाटील – स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. शिरीष परांडे – औषधोपचारतज्ज्ञ, डॉ. विलास पराडके औषधोपचारतज्ज्ञ, डॉ. विशाल देसरडा – त्वचारोग तज्ज्ञ, डॉ. स्वगात शाह – त्वचारोग तज्ज्ञ, डॉ. गणेश पाकळे – रेडिओलॉजिस्ट, डॉ. आकाश पटेल – दंतविशेषज्ञ, डॉ. राजेश वसावे – शल्यविशारद,
IMA नंदुरबार शाखेच्यावतीने सर्व सहभागी डॉक्टर, स्वयंसेवक आणि नगरपरिषदेचे अधिकारी यांचे आभार. या उपक्रमातून केवळ आरोग्यसेवा न होता, एक सामाजिक कर्तव्याची जाणीव आणि सन्मानाची भावना देखील वृद्धिंगत झाली.

Call Us