फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या; पोलिस अधिकाऱ्यावर बलात्कार आणि छळाचे गंभीर आरोप…
फलटण/सातारा || दि. 24 ऑक्टोबर 2025 || (फिरोज खान)-: फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे (वय 28 वर्ष) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या फलटण येथील एका हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळल्या. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉ. मुंडे यांनी दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यावर मागील पाच महिन्यांपासून वारंवार बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रशांत बनकर नावाच्या दुसऱ्या व्यक्तीवर मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सुसाईड नोटमध्ये असा उल्लेखही करण्यात आला आहे की, डॉ. मुंडे यांच्यावर चुकीचा पोस्टमॉर्टेम अहवाल तयार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

या प्रकरणानंतर सातारा जिल्हा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मुख्य आरोपी PSI गोपाल बदने यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
सातारा पोलिस अधीक्षकांनी सखोल तपासासाठी विशेष पथक नेमले असून, सर्व पुरावे जतन करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्र आणि समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने केवळ वैयक्तिक वेदना नाही, तर कार्यस्थळावरील असुरक्षित वातावरण आणि तक्रार व्यवस्थेतील त्रुटींवरही प्रकाश टाकला आहे.
या प्रकरणातील सखोल तपासातून सत्य समोर येऊन पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.
