सुकी नदीचा घाट मृत्यूचा सापळा; प्रशासन झोपेतच!..

सुकी नदीच्या खड्डामय घाटात आणखी किती जणांचे हात-पाय मोडल्यावर होणार डांबरीकरण?

रावेर/जळगाव || दि.२६ डिसेंबर २०२५ || {हमीद तडवी}-: रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा गावाजवळील सुकी नदीच्या पुलावरील घाट हा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या घाटावर मोठमोठे खड्डे पडले असून, तो अक्षरशः अपघातांचा सापळा बनला आहे.या सुकी नदीच्या घाटातून प्रवास करताना अनेक नागरिकांचे डोके फुटले, तर अनेकांचे हात-पाय मोडले आहेत.

दिवसेंदिवस येथे अपघातांचे प्रमाण वाढत असतानाही संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी, आमदार व खासदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.“या खड्ड्यांतून प्रवास करून-करून आम्हाला मारून टाका, तेव्हाच डांबरीकरण करा” अशा संतप्त प्रतिक्रिया लोहारा व परिसरातील नागरिक, शेतकरी आणि मजुरांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

‘जिसको पायी उसने छुपाई’ अशीच परिस्थिती असल्याने या खड्डामय घाटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या मार्गावरून दररोज शेतकरी, मजूर, महिला व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. वारंवार अपघात होऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, याच रस्त्याने बांधकाम विभागाचे अधिकारी, आमदार यांचीही ये-जा होत असते. तरीदेखील त्यांना येथील खड्ड्यांचा धोका दिसत नाही का? असा थेट सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे.

सुकी नदीच्या घाटाचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Call Us