सेवापूर्ती गौरव समारंभ व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न….

सेवापूर्ती गौरव समारंभ व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न….

पिंपळनेर || दि. २७ डिसेंबर २०२५ || (नईम अली) :- जिल्हा परिषद उर्दू शाळा, पिंपळनेर (इंदिरानगर) येथील मुख्याध्यापक बलदारखान अकबखान पठाण यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ व सत्कार सोहळा पिंपळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. योगिता जितेश चौरे या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार मंजुळताई गावित, आसिम खान (वरिष्ठ अधीक्षक, मुंबई पूर्व डाक विभाग), अजिज शेख (IAS), तसेच शिवाजीराव दहिते (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, धुळे) यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.यावेळी फातिमा बी. बलदार पठाण (माजी उपसरपंच, कासारे) — ज्यांनी कासारे गावात दोन वेळा उपसरपंच पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली — यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच विजय साहेबराव गांगुर्डे (माजी उपसरपंच) यांचीही मान्यवर म्हणून उपस्थिती होती.

मान्यवरांनी आपल्या भाषणांतून बलदारखान पठाण यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि समाजघडणीत दिलेले योगदान यांचे विशेष कौतुक केले.हाजी बलदार पठाणसर यांच्या योगदानाचे कदर करताना, आम्ही म्हणू शकतो कि ते एक आदर्श शिक्षक आणि मुख्याध्यापक आहेत. त्यांनी शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे.पठाण सरांनी पिंपळनेर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असतांना त्यांच्या कार्यकाळात शाळेची प्रगती झाली आहे आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळाले आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. योगिता चौरे यांनी शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्य हे समाजाच्या प्रगतीचे मजबूत अधिष्ठान असल्याचे नमूद करत पठाण दांपत्याच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व गौरवपत्र प्रदान करून हा सेवापूर्ती गौरव समारंभ प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Call Us