श्री भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम न.प. उर्दू स्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा शुभारंभ….
दोंडाईचा\धुळे || दि. ०३ ऑगस्ट २०२६ || {फिरोज खान}-: विद्यार्थिनींना आत्मनिर्भर, आत्मविश्वासपूर्ण व सुरक्षित बनविण्याच्या उद्देशाने PM SHRI भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नगर परिषद उर्दू स्कूल, दोंडाईचा (जि. धुळे) येथे स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षण उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सलाउद्दीन सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. दर्जेदार शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थिनींनी कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, यासाठी शाळेत नियमित स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीने आत्मविश्वास, निर्भयता आणि स्वाभिमानाने जीवन जगावे, यासाठी शाळा सदैव कटिबद्ध आहे.”
प्रशिक्षणादरम्यान कराटे प्रशिक्षक सिकलगर ए. जे. खान सर यांनी विद्यार्थिनींना विविध स्वसंरक्षण तंत्रांचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले. अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे, संकटसमयी धैर्य व प्रसंगावधान कसे राखावे, तसेच मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्याचे महत्त्व याविषयी त्यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, शिस्त, धैर्य, मानसिक बळ आणि स्वसंरक्षणाची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला. शैक्षणिक प्रगतीसोबत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, भविष्यातही असे प्रशिक्षण सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
यावेळी मोहसीन शेख सर, साजिद खाटीक सर, मंजूम पठाण सर, कराटे प्रशिक्षक सिकलगर ए. जे. खान सर तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थिनींच्या सुरक्षित, सक्षम आणि सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
