घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ आरोपी जेरबंद, २ अल्पवयीन ताब्यात….
२ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसेही जप्त
नंदुरबार || दि.१९ ऑक्टोबर २०२६ || ( फिरोज खान ) :- नंदुरबार शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये रोकड, चांदीचे शिक्के, मोबाईल, मोटारसायकल तसेच गुन्ह्यात वापरलेला २५ हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा आणि ४ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं. ८२२/२०२६ तसेच उपनगर पोलीस ठाणे गुरनं. ३८२/२०२६ अंतर्गत दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आढावा घेत आरोपींना जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परेश ऊर्फ लल्ला रवी वळवी, दर्शन ऊर्फ लकी प्रविण चौधरी, विक्की ऊर्फ मिक्की रायसिंग तडवी, रघुवीर ऊर्फ रघु गंगाराम पाडवी आणि राजन रायसिंग पाडवी या संशयितांची चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपींनी घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये ९० हजार रुपये रोख, २२ ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के, तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन मोटारसायकल वाहने यांचा समावेश आहे. तसेच उपनगर पोलीस ठाणे गुरनं. ३८२/२०२६ मधील चोरीच्या मुद्देमालापैकी ३२ हजार २०० रुपये किमतीची विदेशी दारू, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण ८२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
दरम्यान, दोन्ही गुन्ह्यांतील एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा आणि ४ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत ५ आरोपी आणि २ विधी संघर्षग्रस्त बालकांकडून दोन्ही गुन्ह्यांतील मिळून २ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल, तसेच गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ तसेच तळोदा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
