१७ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा जाळ्यात : ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त….

१७ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा जाळ्यात : ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त….

नंदुरबार || दि : २२ ऑकटोबर २०२६ || (फिरोज खान) :- नंदुरबार शहरात घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला ताब्यात घेत दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून दोन मोबाईल फोन आणि एक मोटार सायकल असा एकूण ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील प्लॉट क्रमांक ४१, योगेश्वर कॉलनी, नव्हा रोड परिसरात १८ सप्टेंबरच्या रात्री घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून घरातील लॉकरमधून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी प्रविण लोटन कोळी, रा. सुटकार, ता. चोपडा, जि. जळगाव याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने नंदुरबार शहरातील दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याच्या खिशातून दोन मोबाईल फोन मिळून आले. त्यापैकी एक मोबाईल नंदुरबार येथून चोरी केल्याची माहिती त्याने दिली.

दरम्यान, आरोपीच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत चौकशी केली असता ती मोटारसायकल नंदुरबार शहरातून १५ ते २० दिवसांपूर्वी चोरी केल्याचे त्याने सांगितले.

या प्रकरणी गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता उपनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीकडून २२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रविण लोटन कोळी याच्याविरुद्ध चोपडा व अमळनेर परिसरात यापूर्वी १७ मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यासोबत असलेल्या राहुल उर्फ भावशा बळीराम बावीस्कर याच्याविरुद्धही अमळनेर पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ तसेच पोलीस हवालदार आणि अंमलदारांच्या पथकाने केली.

Call Us