१ कोटी ३१ लाखांचा २६२ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई….

१ कोटी ३१ लाखांचा २६२ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई….

नंदुरबार || दि. ०७ ऑक्टोबर २०२६ || (फिरोज खान) -: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची वाहतूक व साठा, अवैध अग्निशस्त्रे तसेच अंमली पदार्थांची लागवड आणि विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २६२ किलो गांजाची झाडे जप्त केली असून, त्याची किंमत तब्बल १ कोटी ३१ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी गावाच्या शेतशिवारातील रुणमालपाडा परिसरात एका व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करून त्याची जोपासना केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांडवी गावाच्या शेतशिवारातील वनपट्ट्यात पाहणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण २६२ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ कोटी ३१ लाख १५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पिंटू ऊर्फ पिंट्या मिठ्या पटले, रा. मांडवी बु., रुणमालपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने वनजमिनीमध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करून त्याची जोपासना केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले.

जप्त करण्यात आलेली गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तसेच आरोपीविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, सुनील येलवे, सचिन वसावे तसेच पोलीस अंमलदार मनोज महाजन, अभय राजपूत, निशीगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील आणि राहुल पांढारकर यांचा सहभाग होता.

Call Us