नंदुरबारमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! १५ हजारांची लाच घेताना दोन लोकसेवक रंगेहात जाळ्यात…
नंदुरबार || दि. 23 नोव्हेंबर 2026 || (फिरोज खान) :- नंदुरबार जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन लोकसेवकांना रंगेहात पकडले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा येथील कार्यालयाशी संबंधित या कारवाईमुळे शासकीय विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३१ वर्षीय पुरुष असून, त्यांची धुळे येथून नंदुरबार जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत बदली झाली होती. त्यांचे सुधारित वेतन निश्चित करून वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक क्रमांक एक यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपीने १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर आरोपी क्रमांक एक याने ही रक्कम आरोपी क्रमांक दोन यांच्याकडे दिली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले.
या कारवाईत सतपालसिंग केसरीसिंग वळवी (वय ४७), वरिष्ठ लिपिक आणि दुर्गाप्रसिंग महेशसिंग पावडी (वय ४२), रोजंदारी कामगार, या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा चंद्रकांत अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक प्रशांत भुरटे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
