नंदुरबार शहर पोलिसांची गांजा व अवैध दारूविरोधात मोठी कारवाई; २ लाख ५९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नंदुरबार, दि. २८ ऑगस्ट २०२६ (फिरोज खान) :
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा व अवैध दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कंजरवाडा परिसरात केलेल्या या कारवाईत तब्बल २ लाख ५९ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी कंजरवाडा परिसरात गांजा तसेच अवैध दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने कंजरवाडा परिसरात सापळा रचून कारवाई केली. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील, प्रशांत पाटील, नरेंद्र चौधरी, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र धनगर, गणेश नाईक, तसेच पोलीस शिपाई ललित गवळी, रूपेश पगारे, राहुल राठोड, अमित भरवाड, राजेंद्र काटके, नरेंद्र पाडवी, आनंदा मराठे आणि महिला पोलीस शिपाई निंबाबाई वाघमोडे यांचा पथकात सहभाग होता.
पोलिसांनी संशयित ईश्वर शिवधन गुमाने (वय ३६, रा. कंजरवाडा, नंदुरबार) यांच्या राहत्या घराची कायदेशीररीत्या झडती घेतली. या झडतीदरम्यान पोलिसांना ५ किलो सुका गांजा, ८२ लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच बिअरच्या बाटल्या, असा एकूण २ लाख ५९ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७७/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क), २०, २२ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन…
नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत गांजा, अंमली पदार्थ, गावठी हातभट्टीची दारू, अवैध मद्यविक्री किंवा इतर कोणतेही बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले आहे.
तसेच, माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
