उस्मानीय पार्क सोशल कमिटीच्या वतीने नात-ए-पाकचा भव्य कार्यक्रम; ८० बालक-बालिकांचा उत्स्फूर्त सहभाग….
जळगाव || दि. २७ ऑगस्ट २०२६ || (विठ्ठल भालेराव)-: पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त उस्मानीय पार्क सोशल कमिटी यांच्या वतीने शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क येथे २६ ऑगस्ट २०२६ रोजी नात-ए-पाकचा भव्य कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुमारे ८० बालक-बालिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ७ वाजता झाली आणि रात्री ११ वाजेपर्यंत विविध नात-ए-पाक सादरीकरणे झाली. बालवाडी ते इयत्ता नववीपर्यंतच्या ४ ते १३ वर्षे वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी तीन गट तयार करण्यात आले होते. पहिल्या गटात बालवाडी ते इयत्ता चौथी, दुसऱ्या गटात इयत्ता पाचवी ते सातवी, तर तिसऱ्या गटात इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना ट्रॉफी, पुस्तके, पेन आदी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. मुस्ताक करीम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढविला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला चॉकलेट देण्यात आले.
मुस्ताक करीम सर आणि मोहम्मद आसीम सर यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला विविध प्रकारच्या लेखणी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शिक्षण, आत्मविश्वास आणि भविष्यातील वाटचालीबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांच्या नात-ए-पाक सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी इकबाल तडवी सर, इस्माईल सुलेमान सर आणि मुस्ताक सर यांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तिन्ही परीक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमाला शेवटपर्यंत उपस्थित राहून सर्व सहभागींच्या सादरीकरणाचे बारकाईने परीक्षण केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुस्ताक करीम सर, मझर पठाण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, बाबुभाई, डॉ. नवीद साहेब, जमीर भाई नागोरी, नाजीम भाई पेंटर, अजहर भाई (MR), हुजेफ कादरी, कासिम कादरी, मतीन भाई आणि वसीम भाई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कादरी फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी साहेब, ऍड.मझर पठाण साहेब, वसीम खलील साहेब आणि पत्रकार इम्रान भाई यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
समारोपावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार व अवॉर्ड प्रदान करण्यात आले. बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यात संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी मुस्ताक करीम सर यांनी उस्मानीय पार्क सोशल कमिटी, आयोजक, पोलीस प्रशासन, प्रमुख पाहुणे, परीक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांचे आभार मानले. पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने रहिवासी व पालक उपस्थित होते. बालकांच्या शानदार नात-ए-पाक सादरीकरणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा उत्साह वाढविला.
