प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील FSSAI नोंदणीच्या सक्तीविरोधात मुख्याध्यापक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन…
नंदुरबार, दि. २७ ऑगस्ट २०२६ (फिरोज खान) -: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना अन्न व्यवसाय नोंदणी (Food Business Registration) अर्थात FSSAI नोंदणी बंधनकारक करू नये,
या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने शालेय पोषण आहार योजनेतील मुख्याध्यापकांची जबाबदारी कमी करून भोजन तयार करण्याची व वितरणाची जबाबदारी बचत गटांकडे सोपवली आहे.
असे असताना शाळांना पुन्हा FSSAI नोंदणीची सक्ती करून मुख्याध्यापकांवर अतिरिक्त जबाबदारी लादणे योग्य नसल्याचे मुख्याध्यापक संघाने निवेदनात म्हटले आहे.

मुख्याध्यापक संघाच्या प्रमुख मागण्या…
१) शालेय पोषण आहार योजनेची जबाबदारी मोठ्या प्रमाणात बचत गटांकडे सोपवण्यात आली आहे.
त्यामुळे मुख्याध्यापकांवरील अनावश्यक प्रशासकीय जबाबदारी वाढवू नये.
२) शाळांना FSSAI नोंदणी करण्याची केलेली सक्ती तातडीने रद्द करण्यात यावी.
३) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात यावी, जेणेकरून मुख्याध्यापकांवर अतिरिक्त प्रशासकीय कामाचा भार पडणार नाही.
मागण्या मान्य न झाल्यास बहिष्काराचा इशारा..
मुख्याध्यापक संघाच्या या मागण्यांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अनुदानित खासगी शाळांचे मुख्याध्यापक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेवर पूर्णपणे बहिष्कार टाकतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन..
माध्यमिक शिक्षणाधिकारी रोकडे यांना निवेदन सादर करण्यात आले. मुख्याध्यापकांनी मांडलेल्या मागण्या आणि त्यांच्या भावना शासन स्तरावर नक्कीच पोहोचवण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती…
निवेदन देताना नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, सचिव चंद्रकांत पाटील, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, सहसचिव निंबा माळी सर, कोषाध्यक्ष सुधाकर सैदाणे सर, उपाध्यक्ष विनय गावित सर, फय्याज खान, मनोहर साळुंखे सर, एल. एस. पाटील सर, माजी तालुका अध्यक्ष कपूरचंद मराठे, तारकेश्वर भाई, अनिल चौधरी सर, राकेश जोशी, लक्ष्मीकांत पाटील, किरण पाटील, संजय सैंदाने, जगदीश पाटील, भिकू त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.
