अल्पसंख्यांक बहुल भागासाठी नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करण्याची मागणी; रहमत फाउंडेशनचे महिला व बाल विकास मंत्र्यांना निवेदन..
नंदुरबार || दि. ६ ऑगस्ट २०२६ || (फिरोज खान)-: नंदुरबार शहरातील इसामू नगर, काळी मस्जिद परिसर, चिराग अली मोहल्ला, कुरेशी मोहल्ला, रज्जाक पार्क, सुतार मोहल्ला आणि मणियार मोहल्ला या भागात दाट लोकवस्ती असून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, या संपूर्ण परिसरात आजपर्यंत एकही शासकीय अंगणवाडी केंद्र उपलब्ध नसल्याने लहान बालके, गर्भवती माता आणि स्तनदा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत रहमत फाउंडेशन, नंदुरबार यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित परिसरात तातडीने नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करून सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या भागात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची संख्या लक्षणीय असून, अंगणवाडी केंद्र नसल्यामुळे बालपोषण, लसीकरण, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच माता-बाल आरोग्याशी संबंधित अनेक शासकीय सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून संबंधित परिसरासाठी स्वतंत्र अंगणवाडी केंद्रास तातडीने मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा रहमत फाउंडेशनने व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा देत शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
