SIR अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या BLO, सुपरव्हायझर आणि तरुण स्वयंसेवकांचा सत्कार…

SIR अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या BLO, सुपरव्हायझर आणि तरुण स्वयंसेवकांचा सत्कार…

नंदुरबार || दि. ७ ऑगस्ट २०२६ || (अशफाक शेख) -: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अर्थात SIR प्रक्रियेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या BLO, सुपरव्हायझर तसेच तरुण स्वयंसेवकांचा गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी मस्जिद-ए-उमर येथे विशेष सत्कार करण्यात आला. जनाब खाटीक युनूस इब्राहिम यांच्या अध्यक्षतेखाली मगरीबच्या नमाजानंतर पटेलवाडी येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत BLO आणि सुपरव्हायझर यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन नागरिकांशी संपर्क साधत आवश्यक माहिती संकलित केली. तसेच मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करून SIR प्रक्रियेला प्रभावीपणे हातभार लावला.

या कार्यात तरुण स्वयंसेवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. नागरिकांमध्ये जनजागृती करणे, आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे तसेच मतदारांना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

या सर्वांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पटेलवाडी येथील मस्जिद-ए-उमर ट्रस्टच्या वतीने सुपरव्हायझर डॉ. विजय सोनवणे सर, BLO काझी मुदस्सर सर, सैय्यद मुजाहीद सर, कुरेशी अर्शद सर तसेच तरुण स्वयंसेवक पठाण नईम तुराब, गोलू पिंजारी, मेमन अदनान, शेख नदीम, शेख फरदिन, धोबी अलतमश आणि नासिर शाह यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारार्थी BLO, सुपरव्हायझर आणि तरुण स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती शाहरुख यांनी केले, तर आभार मस्जिद-ए-उमरचे मुतवल्ली शेख युसूफ यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मस्जिद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह तरुण वर्गाने विशेष परिश्रम घेतले. तसेच मुतवल्ली शेख युसूफ यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर नागरिक, BLO, सुपरव्हायझर आणि तरुण स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले.

याप्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Call Us