साखरपुड्याऐवजी साधेपणाने पार पडले लग्न; उस्मानिया पार्कमध्ये अनोखा सामाजिक संदेश..
जळगाव || दि.२० सप्टेंबर २०२६ || (प्रतिनिधी)-: चाळीसगाव येथून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जळगावातील उस्मानिया पार्क येथे आलेल्या दोन्ही कुटुंबीयांनी सामूहिक विचारातून साखरपुडा न करता त्याच कार्यक्रमात साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला. उपस्थित नातेवाईक, समाजसेवक व ऊस्मानीय पार्क मोहल्ला कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवरदेव वकार अहमद अब्दुल सईद शेख आणि नवरी सालेहा परवीन इंतेखाब शेख यांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला.
चाळीसगाव येथील अब्दुल सईद अब्दुल रज्जाक शेख यांचे सुपुत्र वकार अहमद अब्दुल सईद शेख आणि नवरीचे वडील इंतेखाब मोहम्मद हारून यांची कन्या सालेहा परवीन इंतेखाब शेख यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आज, २० सप्टेंबर २०२६ रोजी उस्मानिया पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपस्थितांनी चर्चा करून साखरपुडा करण्याऐवजी याच छोटेखानी कार्यक्रमात विवाह करण्याचा निर्णय घेतला.
साखरपुडा व त्यानंतर होणाऱ्या विवाहासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून साधेपणा, परस्पर सहकार्य आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही कुटुंबीयांनी या निर्णयाला सहमती दर्शविल्यानंतर उपस्थितांच्या साक्षीने वकार अहमद अब्दुल सईद शेख आणि सालेहा परवीन इंतेखाब शेख यांचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने पार पडला.
या प्रसंगी नवरदेवाचे भाऊ रईस अहमद अब्दुल सईद शेख, अनीस अहमद अब्दुल सईद शेख, तसेच फिरोज रज्जाक शेख, फिरोज खान सरवर खान (पाचोरा), सलमान शेख आमीन (अमळनेर) यांच्यासह नवरीचे वडील इंतेखाब मोहम्मद हारून, अमिनोद्दीन शेख (अमळनेर), कलीम शेख अमिनोद्दीन अमळनेर,फारुख कादरी (कादरी फाउंडेशन), मजहर पठाण (जळगाव अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), इम्रान शेख (पत्रकार), अब्दुल अजीज जनाब, मोहम्मद फारूक (ताज हॉटेल) आदी उपस्थित होते.
याशिवाय उस्मानिया पार्क मोहल्ला कमिटी, हमसब फाउंडेशन, उस्मानिया मशिदीचे जवाबदार, तसेच विविध समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह सोहळा साधेपणाने पार पडण्यासाठी उपस्थित सर्वांनी आपापल्या परीने सहकार्य व हातभार लावला.
यावेळी उस्मानीय पार्क मोहल्ला कमिटीच्या वतीने फारुख कादरी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, नातेवाईक, समाजसेवक व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. छोटेखानी कार्यक्रमातच विवाह पार पडल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करून अनावश्यक खर्चाला फाटा देत साधेपणाने विवाह करण्याचा संदेश समाजासमोर ठेवला, अशी भावना व्यक्त केली.
