शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; ५ गुन्ह्यांची उकल, ८५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…
नंदुरबार || दि. १५ सप्टेंबर २०२६ || (फिरोज खान) -: नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून शेती अवजारे, साहित्य तसेच पाण्याच्या विद्युत मोटारी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती.
या कारवाईत शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी व वायर चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल ८५ हजार ९०० रुपये किमतीच्या ५ विद्युत मोटारी व वायर हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली होती.
या बैठकीत मागील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे, साहित्य तसेच पाण्याच्या विद्युत मोटारी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याच्या, तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.
या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी विशेष पथक तयार करून शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे, साहित्य आणि पाण्याच्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई केली.
या कारवाईत गणेश आप्पा भिल (वय ३०), सोमा गोमा भिल (वय २८), बादल मनोज भिल (वय २१) आणि समाधान रविंद्र भिल (वय २०), सर्व रा. खोकराळे, ता. जि. नंदुरबार यांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून एकूण ८५ हजार ९०० रुपये किमतीच्या ५ विद्युत मोटारी आणि वायर हस्तगत करण्यात आल्या.
या मुद्देमालाच्या आधारे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील शेती साहित्य चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे :
१) नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ४६६/२०२५, BNS कलम ३०३(२)
२) नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ४६७/२०२५, BNS कलम ३०३(२)
३) नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ४६८/२०२५, BNS कलम ३०३(२)
४) नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ४६९/२०२५, BNS कलम ३०३(२)
५) नंदुरबार तालुका पोलीस ठाणे अदखलपात्र गु.र.नं. २७८/२०२५, BNS कलम ३०३(२)
या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतातून होणाऱ्या शेती साहित्य व विद्युत मोटारींच्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, या टोळीच्या आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
ही कामगिरी नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, सजन वाघ, मुकेश तावडे, ज्ञानेश्वर पाटील, दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार तसेच पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, यशोदिप ओगले आणि राहुल पांढारकर यांच्या पथकाने केली.
