अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आदिवासी जनजागृती कार्यक्रम संपन्न…..
१२७ आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग; शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
नंदुरबार/अक्कलकुवा ||दि.२९ ऑक्टॉबर २०२६ || (इलियास शेख) :- अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूमच्या अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या सहकार्याने आदिवासी समुदाय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात १० शाळा व महाविद्यालयांतील १२७ आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश खरात आणि जामियाचे अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुलाम जावेद खान यांनी स्वागतपर भाषणातून कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. तसेच, या उपक्रमातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात उपयोगात आणावे आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले. मौलाना हुजैफा वस्तानवी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच, मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त करत मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले. दिनेश खरात यांनी आरोग्य, स्वच्छता आणि चांगल्या सवयींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान सामुदायिक आरोग्य, शासकीय आरोग्य योजना, कम्युनिटी फार्मसी आणि पशू आरोग्य या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. गणेश पवार, जुबेर शेख, महेश बी. कुंवर, डॉ. सय्यद अशफाक, पटेल एन. सिद्दीक आणि पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉ. मुख्तार अहमद खान यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. गुलाम जावेद खान यांनी केले, तर डॉ. एजाज अहमद यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. प्रा. मोहम्मद यहिया आणि डॉ. जमील अब्बास यांनी सूत्रसंचालन केले.
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. आदिवासी समाजात शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करून सामाजिक विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
