झाशीची राणी पथकाची दमदार कारवाई : कॉलेज परिसरात तलवार व कुकरीसह फिरणारा इसम जेरबंद…

झाशीची राणी पथकाची दमदार कारवाई : कॉलेज परिसरात तलवार व कुकरीसह फिरणारा इसम जेरबंद…

नंदुरबार || दि. ०४ ऑगस्ट २०२६ || (फिरोज खान) -: महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या झाशीची राणी पथक आणि दुर्गाशक्ती पथकाने आणखी एक प्रभावी कारवाई करत जी.टी.पी. कॉलेज परिसरात तलवार व कुकरीसारखी घातक शस्त्रे बाळगून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका युवकाला जेरबंद केले आहे.

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसह शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात झाशीची राणी पथक आणि दुर्गाशक्ती पथक कार्यरत असून, दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी एक महिला पोलीस अधिकारी व १३ महिला पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. ही पथके शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे तसेच गर्दीच्या परिसरात साध्या वेशात नियमित गस्त घालत टवाळखोरी, महिलांची छेडछाड, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, संशयास्पद हालचाली आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत.

दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी जी.टी.पी. कॉलेज परिसरात नियमित गस्तीदरम्यान पथकाच्या नजरेस एक युवक संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून सोनेरी मूठ असलेली मध्यम आकाराची लोखंडी तलवार आणि एक कुकरी जप्त करण्यात आली.

ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव भावेश सुनील नाईक (रा. नंदुरबार) असे असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कारवाई नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे, महिला पोलीस शिपाई अंजली पवार, निंबाबाई वाघमोडे, मनाली चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ नाईक, रुपेश पगारे, राजेंद्र कटके तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे पार पाडली.

नागरिकांना आवाहन…

सार्वजनिक ठिकाणी कोणीही बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगत असल्याचे, संशयास्पद हालचाली करत असल्याचे किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कोणतीही बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. नागरिकांकडून मिळणारी वेळेवरची माहिती गंभीर गुन्हे रोखण्यासाठी अत्यंत मोलाची ठरते.

सुरक्षित, शांततापूर्ण आणि गुन्हेमुक्त नंदुरबार घडविण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस सदैव कटिबद्ध असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Call Us