विमल पान मसाला/गुटखा वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई १६ लाख १२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी अटकेत….
नंदुरबार || दि. ०४ ऑगस्ट २०२६ || (फिरोज खान) -: नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला व गुटख्याची गुजरातमधून अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करून तब्बल १६ लाख १२ हजार ४६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गुजरात राज्यातील निझर येथून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित विमल पान मसाला व गुटखा आणला जात आहे. या माहितीच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आडची गावाजवळ सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत GJ 22 H 9941 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार अडवून तिची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल पान मसाला व गुटखा आढळून आला. कारसह एकूण १६,१२,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कारचा चालक प्रमोद मोतिराम शिंदे (वय २६, रा. लहान माळीवाडा, नंदुरबार) याला ताब्यात घेण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी संकेत आबा सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग कैलास बच्छाव करीत असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीस एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार विजय सोनवणे, पोलीस नाईक संदीप जावरे, पोलीस शिपाई संकेत चौधरी, विनायक गावित आणि भगवान मुंडे यांनी सहभाग घेतला.
