५ हजारांची लाच पडली महागात! तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात…..

५ हजारांची लाच पडली महागात! तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात…..

नंदुरबार || दि. ०५ ऑगस्ट २०२६ || (फिरोज खान) -: नंदुरबार जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी विभागाने (ACB) पुन्हा एकदा धडक कारवाई करत तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र नींबा कानडे यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका जमिनीच्या ‘एम’ नमुना प्रमाणपत्रासंदर्भातील प्रकरण आरोपी अधिकाऱ्याकडे प्रलंबित होते. संबंधित प्रकरण पुढे पाठवून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी आरोपी रवींद्र कानडे यांनी तक्रारदाराकडे ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नंदुरबार यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला.

दि. ०४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास तळोदा तहसील कार्यालयाबाहेरील एका चहाच्या दुकानात आरोपी रवींद्र कानडे यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपी रवींद्र नींबा कानडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित) कलम ७ अन्वये तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे (एसीबी, नाशिक परीक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे तसेच पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते (एसीबी, नंदुरबार) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार देवराम गावीत, विजय ठाकरे, जितेंद्र महाले, पोलीस नाईक हेमंतकुमार महाले, सुभाष पावरा व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

तहसील कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यालाच लाच स्वीकारताना अटक झाल्याने महसूल विभागात तसेच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Call Us