शिरपूर गार्डनमध्ये सेंधवा येथील पर्यटकांवर प्राणघातक हल्ला; दोघे गंभीर, पोलिसांवर टाळाटाळीचा आरोप…
शिरपूर || दि. 16 जुलै 2026 || {समीर शेख}-: शिरपूर शहरातील गार्डन परिसरात बुधवारी सायंकाळी पाळण्याच्या तिकीटावरून झालेल्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण झाले. मध्य प्रदेशातील सेंधवा येथून फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटुंबावर काही जणांनी चाकू व लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून महिला, वृद्ध आणि एका अल्पवयीन मुलालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेंधवा येथील १३ सदस्यांचे कुटुंब शिरपूर येथील गार्डनमध्ये फिरण्यासाठी आले होते. पाळण्याच्या तिकिटावरून चालकासोबत वाद झाला. त्यानंतर कुटुंब गार्डनबाहेर पडत असताना काही जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.

या हल्ल्यात मोहम्मद अजहर शेख (२४) यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार करण्यात आला, तर अकरम लतीफ कादर (३६) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. तसेच मेहरून बी (५०), लतीफ लाल मोहम्मद (६०) आणि जोएब शेख (१५) यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व जखमींना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, त्यानंतर त्यांची प्रकृती लक्षात घेऊन धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
जखमी मोहम्मद अजहर शेख यांनी, “आमच्याकडे वैध तिकीट असतानाही वाद घालण्यात आला. गार्डनमधून बाहेर पडताच आमच्यावर नियोजनपूर्वक हल्ला करण्यात आला,” असा आरोप केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात शिरपूर पोलिसांनी मुख्य गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी (क्रॉस) तक्रारी नोंदवून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या संदर्भात न्याय मिळावा यासाठी पीडितांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे शिरपूरमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
