सीसीटीव्ही आणि गुप्तहेर माहितीच्या आधारे आरोपींना बेड्या; १४ हजारांची रोकड जप्त
शिरपूर
शिरपूर शहरातील बोहरी गल्ली येथील एका नामांकित किराणा दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरपूर शहर पोलिसांना अवघ्या ४ तासांत यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण रोकड हस्तगत केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी मनीष मोहनलाल अग्रवाल (रा. बोहरी गल्ली, बालाजी मंदिर जवळ, शिरपूर) यांचे शहरातील ‘अक्षद ट्रेडिंग’ नावाचे किराणा दुकान आहे. दिनांक ८ जुलैच्या रात्री ते ९ जुलै २०२६ च्या सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी या दुकानातून १४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(३) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांचे जाळे; ४ तासांत आवळल्या आवळल्या बेड्या
गुन्हा दाखल होताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यांनी तातडीने पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याच वेळी प्राप्त झालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४ तासांच्या आत शहरातील लोहार गल्लीत राहणाऱ्या (१) मतीन खलील तेली आणि (२) मकसूद अख्तर मेहतर या दोन संशयितांना ताब्यात घेतले.
दोघांची पोलीस खाक्या दाखवून सखोल विचारपूस केली असता, त्यांनी या चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेली १४ हजार रुपयांची रोकड (ज्यामध्ये १००, ५०, २०, १०, ५, २ आणि १ रुपयांच्या दराच्या एकूण २,०५९ चलनी नोटा व नाणी समाविष्ट आहेत) जप्त केली आहे.
या पथकाने केली उत्कृष्ट कामगिरी
शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या ४ तासांत या चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केल्याने व्यापारी वर्गातून पोलिसांचे कौतुक होत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार आणि मनोज महाजन यांच्या पथकाने केली.
