जळगाव जिल्ह्याला लाभले नवीन पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डींची पुण्यात बदली, तर श्रीकांत धिवरे जळगावचे नवे ‘बॉस’…
जळगाव || दि.२० एप्रिल २०२६ || {प्रतिनिधी} -: महाराष्ट्र राज्य गृहविभागाने आज पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता श्रीकांत धिवरे (Shrikanth Dhivare) यांची जळगावचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली: जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती आता पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जळगावमधील कार्यकाळात त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्हे निकाली काढण्यात यश मिळवले होते.
श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती…
जळगावचे नवे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे धुळे येथून बदलून येत आहेत. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, आता जळगाव जिल्ह्याची धुरा त्यांच्या खांद्यावर असेल.
प्रशासकीय फेरबदल..
राज्यातील एकूण ९ वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज २० एप्रिल २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले. यामध्ये जळगावसह कोल्हापूर, सातारा आणि सांगली यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मुख्य आव्हान नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासमोर असणार आहे. ते लवकरच आपला पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे.
