महाराष्ट्र कुस्ती संघटनेकडून ज्येष्ठ मल्लांचा महासन्मान; नंदुरबारच्या पै. नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड….

महाराष्ट्र कुस्ती संघटनेकडून ज्येष्ठ मल्लांचा महासन्मान;
नंदुरबारच्या पै. नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड….

नंदुरबार || दि. ०५ ऑक्टोबर २०२६ || (फिरोज खान)-: नंदुरबारच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सुप्रसिद्ध पैलवान पै. नायाब कुरैशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या महाराष्ट्र कुस्ती महासन्मान सोहळ्यात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने ‘महाराष्ट्र कुस्ती महासन्मान सोहळा व पहिले अधिवेशन’ मोठ्या उत्साहात पार पडले.

या अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याला विशेष सन्मान मिळाला. नंदुरबारचे सुप्रसिद्ध पैलवान पै. नायाब कुरैशी यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. कुस्तीचा प्रचार आणि प्रसार, भव्य कुस्तीच्या दंगलींचे आयोजन तसेच युवा पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी पै. नायाब कुरैशी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष संग्राम कांबळे आणि उपाध्यक्ष अमोल मदने यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. या भव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी भूषविले. यावेळी हिंदकेसरी, रुस्तमे हिंद आणि १९६६ चे महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह, ज्येष्ठ छायाचित्रकार बापू मकानदार, तसेच बंडा पाटील रेंट्रेकर यांच्या वतीने त्यांचे पुत्र दिनेश पाटील यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.

याशिवाय कुस्ती क्षेत्रातील विविध मान्यवरांसह एकूण ४२ मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, शामराव जाधव, भगवान बापू करणकाळ, राम कानडे, गोरख पाटील, संजय आवळे, नितीन ठोंबरे, नजीब तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

नंदुरबारसाठी अभिमानाचा क्षण..

पै. नायाब कुरैशी यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड ही नंदुरबारच्या कुस्ती क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील कुस्तीला नवी दिशा मिळण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील होतकरू आणि युवा पैलवानांना अधिक चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Call Us