कायद्याच्या रक्षकांच्या प्रमुखांचेच व्हॉट्सॲप अकाउंट हॅक! ठाणे पोलीस दलात खळबळ…
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर सुमारे २० अश्लील व्हिडिओ अपलोड; दोन तासांच्या प्रयत्नानंतर व्हिडिओ हटवण्यात यश, सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे/मुंबई || दि. १८ नोव्हेंबर २०२६ || (वसंत चव्हाण)-: कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाच्या प्रमुखांचेच व्हॉट्सॲप अकाउंट सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आल्याची धक्कादायक घटना ठाण्यात समोर आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर अनधिकृत प्रवेश करून त्यांच्या स्टेटसवर सुमारे २० अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा प्रकार सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि सायबर सेलने तातडीने कारवाई सुरू केली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व व्हिडिओ हटवण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ४:४५ वाजता पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अचानक अश्लील व्हिडिओ दिसू लागले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अकाउंटवर अशा प्रकारची संशयास्पद हालचाल आढळून आल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली. घटनेची माहिती पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच तातडीने यंत्रणा सक्रिय करण्यात आली.
सायबर हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या पथकांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. अकाउंटवरील अनधिकृत हालचाली रोखणे, अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ हटवणे आणि अकाउंट सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास दोन तासांच्या सततच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास व्हॉट्सॲप स्टेटसवरील सर्व अश्लील व्हिडिओ हटवण्यात आले.
या घटनेमुळे ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डिजिटल सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस उपायुक्त पराग मनेरा यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
या प्रकरणी ठाण्यातील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित अकाउंटवर अनधिकृत प्रवेश नेमका कसा मिळवण्यात आला, याचा तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांकडून तांत्रिक माहिती तपासली जात असून, या प्रकारामागे कोणाचा हात आहे आणि कोणत्या पद्धतीने अकाउंटचा गैरवापर करण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ किंवा संशयास्पद सामग्री दिसल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, ते डाउनलोड करू नयेत किंवा इतरांना फॉरवर्ड करू नयेत. तसेच कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अपुष्ट माहिती अथवा अफवा पसरवण्यापासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर घडलेल्या या प्रकारामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, डिजिटल माध्यमांचा वापर करताना प्रत्येकाने अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
