नंदुरबारमध्ये जनगणना-२०२७ च्या तयारीला वेग! २५ जानेवारीपासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेला सुरुवात…

नंदुरबारमध्ये जनगणना-२०२७ च्या तयारीला वेग! २५ जानेवारीपासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेला सुरुवात…

नंदुरबार || दि. १८ नोव्हेंबर २०२६ || (फिरोज खान) -: जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात १६ व १७ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जनगणना-२०२७ चे महत्त्वाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

  • १० ते २४ जानेवारी २०२७ : स्वयंगणना (Self Enumeration)
  • २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ : प्रत्यक्ष लोकसंख्या गणना

जनगणनेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, सीएमएमएस (CMMS) पोर्टलद्वारे ऑनलाइन कामकाज तसेच नागरिकांकडून ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी संबंधित कामकाजाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जनगणनेचे काम अत्यंत अचूकतेने, काळजीपूर्वक आणि विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि दक्षतेने काम करण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षण शिबिराला निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जनगणना कार्य संचालनालयाचे सहायक संचालक अजय ठाकूर, श्रीकांत बनकर, नायब तहसीलदार रमेश वळवी यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Call Us