विदेशी दारूसह ४ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, उपनगर पोलिसांची कारवाई….
नंदुरबार : दि.०९ ऑक्टॉबर २०२६ ( फिरोज खान ) :- विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विदेशी दारूची चोरीछुप्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईदरम्यान विदेशी दारूसह एकूण ४ लाख ४४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकाच्या ढाब्याजवळ, उड्डाणपुलाखाली पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
या माहितीच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तसेच नंदुरबार उपविभागीय पोलीस कार्यालयातील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकण्याची तयारी केली. मात्र, पोलिस आल्याचे लक्षात येताच कारजवळ उभा असलेला अज्ञात आरोपी कार सोडून घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी उभी असलेली पांढऱ्या रंगाची इको स्पोर्ट कार (क्रमांक GJ 27 AP 2060) तपासली. या कारमध्ये एकूण ४ लाख ४४ हजार ५५० रुपये किमतीची विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी विदेशी दारूसह वाहन जप्त केले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई संकेत वामन चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) व १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पोलिसांनी विदेशी दारूची वाहतूक करणारे वाहन जप्त केले असले, तरी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
