लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; राज्य कर निरीक्षकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारली….
नंदुरबार || दि. ०९ ऑक्टॉबर २०२६ || (फिरोज खान) :- राज्य कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
या प्रकरणात राज्य कर अधिकारी संदीप पाटील आणि राज्य कर निरीक्षक विवेक घोडके यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती. तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जीएसटी विवरणपत्रांशी संबंधित प्रकरणात आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ मधील विवरणपत्रे न भरल्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या.
या प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात संबंधित लोकसेवकांनी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान ५० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी राज्य कर अधिकारी संदीप पाटील आणि राज्य कर निरीक्षक विवेक घोडके यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या पथकाने केली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी या कारवाईवर देखरेख करत होते.लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
