जळगाव जिल्ह्यात सरकारी गायरान जमीन विक्रीचा मोठा गैरव्यवहार? 22 खरेदी-विक्री दस्तऐवज समोर; कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष…

जळगाव जिल्ह्यात सरकारी गायरान जमीन विक्रीचा मोठा गैरव्यवहार? 22 खरेदी-विक्री दस्तऐवज समोर; कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष…

जळगाव || दि. २९ मार्च २०२६ || (विठ्ठल भालेराव)-: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात पिंपरी मोंढाळे येथील सरकारी गायरान जमिनीच्या बनावट कागदपत्रांद्वारे 4 ते 5 एकर जमीन परस्पर विक्री झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित दोषींवर कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, पिंपरी मोंढाळे येथील सर्वे क्रमांक 84 व सर्वे क्रमांक 4 मधील सरकारी गायरान जमिनीबाबत काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीर विक्री व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात एकूण 22 खरेदी-विक्री दस्तऐवज समोर आल्याचेही सांगितले जात आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असून संबंधित चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही अद्याप दोषींवर ठोस कारवाई झालेली नसल्याने स्थानिक नागरिक आणि तक्रारदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, या प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी व मंडळ अधिकारी यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असून, समितीला संबंधित जमीन गायरान आहे का, त्यावर अतिक्रमण झाले आहे का आणि कागदपत्रांची सत्यता काय आहे याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच समितीला 30 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या गंभीर प्रकरणात प्रशासनाकडून पुढील काळात कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Call Us