पिंपरीनांदू येथे तापी नदीचा जन्मोत्सव उत्साहात साजरा; नदी स्वच्छतेचा घेतला सामूहिक संकल्प….

मुक्ताईनगर || दि. २१ जुलै २०२६ || (कैलाश कोळी)-: पिंपरीनांदू ता. मुक्ताईनगर येथे भोई समाजाच्या वतीने तापी नदीचा जन्मोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्गाचे अनमोल वरदान असलेल्या तापी नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच तिचे पावित्र्य आणि स्वच्छता जपण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला.

१९ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात नदीकाठी विधिवत गणपती पूजनाने झाली. त्यानंतर तापी मातेला हिरवी साडी, चोळी, बांगड्या, फुलहार व अष्टगंध अर्पण करून ओटी भरण्यात आली. मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात तापी नदीची आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांनी नदीच्या अखंड प्रवाह, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भोई समाजाने घेतलेला नदी स्वच्छतेचा संकल्प होय. माजी ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार तथा मनसे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितांनी तापी नदीत कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा घाण टाकणार नसल्याची शपथ घेतली. तसेच नदीकाठचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचला. नदी ही केवळ जलस्रोत नसून जीवनदायिनी आहे, तिचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मधुकर भोई व त्यांच्या पत्नी सौ. मालती भोई यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी गंभीर भोई, मनोज भोई, भावेश भोई, बबनराव भोई, प्रमोद भोई, सुमित भोई, भागवत तायडे, सुवर्णा भोई, लीलाबाई भोई, गायत्री भोई, कांचन कोळी, चंदाबाई भोई, महेंद्र भोई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून पर्यावरण संरक्षण आणि नदी संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला आहे.

Call Us