ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर; ४५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर; ४५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

नंदुरबारमध्ये दो शाह तकिया ब्लड फाउंडेशन व यंग सर्कलचा स्तुत्य उपक्रम

नंदुरबार || दि. २८ ऑगस्ट २०२७ || (फिरोज खान)-: जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी ﷺ अर्थात पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा ﷺ यांच्या जयंतीनिमित्त दो शाह तकिया ब्लड फाउंडेशन आणि दो शाह तकिया यंग सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार रोजी नंदुरबार शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवतेची सेवा, सामाजिक बांधिलकी आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश दिला. गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. शिबिरस्थळी फ्रूट वॉटर, कोल्ड्रिंक तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. रक्तदानानंतर रक्तदात्यांना आवश्यक अल्पोपहार व शीतपेय देण्यात आले.

दरम्यान, शिबिराचे यशस्वी आयोजन आणि रक्त संकलनासाठी सहकार्य केल्याबद्दल रक्त संकलन करणाऱ्या लॅबच्या वतीने आयोजक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी दो शाह तकिया ब्लड फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी आयोजकांनी “रक्तदान हे श्रेष्ठदान असून, प्रत्येक निरोगी व्यक्तीने पुढे येऊन नियमित रक्तदान करावे,” असे आवाहन केले. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून मानवता, बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दो शाह तकिया ब्लड फाउंडेशन आणि दो शाह तकिया यंगh सर्कलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, नागरिक, संस्था व स्वयंसेवकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Call Us