धडगावमध्ये ९३ लाखांचा १८६ किलो गांजा जप्त…

धडगावमध्ये ९३ लाखांचा १८६ किलो गांजा जप्त…

ज्वारीच्या शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

नंदुरबार || दि. ९ सप्टेंबर २०२६ || (फिरोज खान) -: आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक व साठा, अवैध अग्निशस्त्रे तसेच अंमली पदार्थांची लागवड व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे.

दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेंदा गावातील शेतशिवारात एका इसमाने ज्वारीच्या पिकामध्ये आर्थिक फायद्यासाठी गांजाची बेकायदेशीर लागवड केली आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तत्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेंदा गावातील संबंधित शेतशिवाराची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान ज्वारीच्या पिकामध्ये एकूण १८६ किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली. या गांजाची अंदाजे किंमत ९३ लाख ६ हजार रुपये असल्याचे समोर आले.

सदर गांजाची लागवड निर्मल वनकर पावरा, रा. गेंदा, पोस्ट चिखली, ता. धडगाव, जि. नंदुरबार याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ज्वारीच्या अंतरपिकात बेकायदेशीररीत्या केल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजाची झाडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतली आहेत.

याप्रकरणी आरोपी निर्मल वनकर पावरा याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सजन वाघ, योगेंद्र सोनार, दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, स्वप्नील गोसावी, दत्तात्रय बागल, सचिन वसावे, तसेच पोलीस अंमलदार यशोदीप ओगले, शोएब शेख, सचिन सैंदाणे, भरत उगले यांच्या पथकाने केली.

अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरूच असून, बेकायदेशीर गांजा लागवड करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे.

Call Us