निवडणुकीत सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यास निर्बंध; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे निर्देश..
नंदुरबार, दिनांक 27 ऑक्टोबर, 2024 (फिरोज खान)-: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यातील कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या संदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2024 पासून घोषित केला आहे. या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रूग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या आवारात तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.
हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आदेशित केले आहे.