आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त नंदुरबार येथे विविध स्पर्धा व परिसंवाद कार्यक्रम संपन्न..

आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त नंदुरबार येथे विविध स्पर्धा व परिसंवाद कार्यक्रम संपन्न..

नंदुरबार दि. १८ डिसेंबर २०२५ (फिरोज खान) -: अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा नियोजन विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त जिल्हा नियोजन भवन, नंदुरबार येथील सभागृहात वक्तृत्व, भित्तीपत्र व निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी आशा सांघवी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे विजय सैंदाणे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एजाज बागवान, मौलाना जकरीया व अमिन कुरैशी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे महत्त्व व आयोजित स्पर्धांची माहिती दिली.

यानंतर विद्यार्थी मनोगत कार्यक्रमात काजी निदा फातेमा, लायबा सैय्यद, फहमिना शाह, अतिफा मोमीन, आमेना सैय्यद, कादीर अन्सारी व दानिश कुरैशी यांनी आपले विचार मांडले.

यावेळी अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे विजय सैंदाणे यांनी दिली.

अध्यक्षीय समारोपात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजना-:
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुढील महत्त्वाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत —

  1. अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविणे
  2. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
  3. धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत व ५१% पेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्य असलेल्या संस्थांना पायाभूत सुविधा पुरविणे
  4. निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना (अल्पसंख्याक उमेदवारांसाठी)

संपर्क: जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, नंदुरबार

  1. अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजना
    संपर्क: मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत
  2. अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजना
    संपर्क: उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद
  3. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना
  4. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मुदत कर्ज योजना
  5. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सूक्ष्म पतपुरवठा योजना
  6. मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

संपर्क: मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार

या प्रसंगी अल्पसंख्यांक विकासाच्या विविध योजनांची माहिती दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण व प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच आयोजित वक्तृत्व, भित्तीपत्र व निबंध स्पर्धांमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

तसेच तालुकास्तरावर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्राचार्य फैय्याज पठाण, हरीष बोरसे, रफिक जहांगीरदार, जव्वाद सैय्यद, सत्यजित नाईक, कालिदास पाठक, इसरार सैय्यद व मुदब्बीर पठाण यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अशफाक इनामदार व जव्वाद कुरैशी यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात विशेष बाब म्हणून दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असूनही वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या रहेबर शाळा, नंदुरबार येथील विद्यार्थी मोहम्मद दानिश कुरैशी यांचा अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत ₹1100/- रोख रकमेने गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे डॉ. युनूस पठाण यांनी केले तर आभार जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी लक्ष्मण कोकणी व संतोष बोधडे तसेच मनीष सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Call Us