त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मुक्ताईनगरात निषेध;तहसीलदार व पो. निरीक्षकांना निवेदन..
जळगाव/मुक्ताईनगर || दि. २३ सप्टेंबर २०२५ || (कैलास कोळी)-: त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
पत्रकार संघटनेतर्फे सांगण्यात आले की, या घटनेत पत्रकारांवर झालेली मारहाण गंभीर असून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल असून नाशिक पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तथापि, त्र्यंबकेश्वर येथे प्रवेशकर वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेस या कंपनीच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करावा तसेच कंपनीला ब्लॅकलिस्ट करून महाराष्ट्रात कुठेही ठेका देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
पत्रकारांनी यावेळी शासनाकडे प्रश्न उपस्थित केला की, नोव्हेंबर 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात 300 हून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. मात्र यापैकी केवळ 43 प्रकरणांमध्येच पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रकरणांसाठी स्वतंत्र समिती गठित करून प्रलंबित प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली.
या प्रसंगी तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंकज कपले, उपाध्यक्ष अक्षय काठोके, सचिव विठ्ठल धनगर, विनायक वाडेकर सर, सचिन झनके, किरण पाटील, अतिख खान, पंकज तायडे, कैलास कोळी, सुभाष धाडे, टीव्ही 9 प्रतिनिधी रवी गोरे, मंगेश ढोले, सुमित बोदडे आदी उपस्थित होते.
