आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती दगडी गावात उत्साहात साजरी…..
आदिवासी टोकरे कोळी व भिल्ल समाज बांधवांची एकजूट; सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे घडविले अनोखे दर्शन
मुक्ताईनगर || दि. ०९ नोव्हेंबर २०२६ ||(प्रतिनिधी – कैलास कोळी) : आद्यक्रांतिकारक, शूरवीर आणि आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेले क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची जयंती ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दगडी गावात मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येत त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच त्यांच्या शौर्य, संघर्ष आणि अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना उजाळा दिला.
या जयंती सोहळ्याला दगडी गावचे पोलीस पाटील विठ्ठल गोरख कोळी, आदिवासी टोकरे कोळी जमातीचे अभ्यासक जयेश कोळी, प्रवीण ठाकरे, कैलास कोळी, लोकेश कोळी, मनोहर कोळी, विशाल कोळी, अविनाश कोळी, रवींद्र कोळी, प्रवीण कोळी, राजेंद्र कोळी, रोहित कोळी तसेच आदिवासी एकता परिषद व आदिवासी बाप पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र भिल यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन जमाती, एक गाव; एकजुटीचा आदर्श!..
दगडी गाव हे आदिवासीबहुल गाव असून येथे प्रामुख्याने आदिवासी टोकरे कोळी आणि भिल्ल या दोन जमातींचे नागरिक गुण्यागोविंदाने वास्तव्यास आहेत. गावाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असो किंवा महापुरुषांची जयंती, दोन्ही समाजांतील नागरिक कोणताही भेदभाव न करता एकत्र येऊन उत्साहाने सहभागी होतात. परस्परांतील बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक सलोखा जपत गावाने एकजुटीचा आदर्श निर्माण केला आहे.
महापुरुषांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे कार्य आणि संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच समाजात एकता, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी अन्यायाविरुद्ध केलेला संघर्ष, दाखविलेले अतुलनीय शौर्य आणि जपलेला स्वाभिमान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दगडी गावात पार पडलेला हा सोहळा आदिवासी समाजाच्या एकतेचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला.
