जळगावातील रस्ते बांधकामांमध्ये स्क्रॅपिंग सक्तीचे करण्याची मागणी; माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांचे प्रशासनाला निवेदन…

जळगाव || दि. २१ जुलै २०२७ || (विठ्ठल भालेराव)-: जळगाव शहरात सुरू असलेल्या रस्ते बांधकामांमध्ये जुना रस्ता न काढता त्यावरच नवीन काँक्रीट अथवा डांबरी थर टाकण्यात येत असल्याने भविष्यात नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पृथ्वीराज आत्माराम सोनवणे यांनी रस्ते बांधकामांमध्ये स्क्रॅपिंग (मिलिंग) प्रक्रिया बंधनकारक करण्याची मागणी करत विविध शासकीय अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन पाठविले आहे.सोनवणे यांनी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री कार्यालय, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, तसेच जळगावच्या खासदार व आमदार यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे.निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, गेल्या चार-पाच वर्षांत शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र अनेक ठिकाणी जुना रस्ता न काढता त्यावरच नवीन थर टाकण्यात आल्याने रस्त्यांची उंची सातत्याने वाढत आहे.

यामुळे घरांच्या, शाळांच्या, महाविद्यालयांच्या, सरकारी कार्यालयांच्या तसेच इतर सार्वजनिक इमारतींच्या तुलनेत रस्त्याची पातळी वर जात असून पावसाळ्यात पाणी घरांमध्ये व इमारतींमध्ये शिरण्याचा धोका वाढत आहे.यावर उपाय म्हणून प्रत्येक नवीन रस्ता बांधण्यापूर्वी जुन्या रस्त्याचे स्क्रॅपिंग करून आवश्यक त्या जाडीचा भाग काढून टाकावा व त्यानंतरच नवीन रस्ता तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे रस्त्याची मूळ पातळी कायम राहील, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल आणि भविष्यातील आर्थिक व भौतिक नुकसान टाळता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.सोनवणे यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :स्क्रॅपिंग न करता सुरू असलेली रस्त्यांची कामे तात्काळ थांबवावीत.

भविष्यातील सर्व रस्ते बांधकामांमध्ये स्क्रॅपिंग प्रक्रिया सक्तीची करावी.नवीन रस्त्याची पातळी जुन्या रस्त्यापेक्षा वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी.पावसाच्या पाण्याचा निचरा लक्षात घेऊन तांत्रिक नियोजनानुसारच रस्ते बांधकामे करावीत.दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालय (CMO) तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवेदनाची दखल घेण्यात आली असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे उत्तर प्राप्त झाल्याची माहिती सोनवणे यांनी दिली आहे.

प्रशासनाने या विषयावर तातडीने कार्यवाही करून भविष्यातील संभाव्य अडचणी टाळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने रस्ते बांधकामांमध्ये तांत्रिक नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Call Us