पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जीवघेणा हल्ला; आरोपी पतीला जन्मठेप….
नंदुरबार || दि २४ ऑक्टॉबर २०२६ || (फिरोज खान) :- शहादा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी पतीला शहादा येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला १३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणपुरी येथील या प्रकरणात विलास अंबर ठाकरे याने पत्नी राधाबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वारंवार वाद घातल्याचे तपासात समोर आले होते. दारूच्या व्यसनामुळेही पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
२७ ऑगस्ट २०१८ रोजी राधाबाई यांच्यावर लोखंडी भाल्याने हल्ला झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विलास अंबर ठाकरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ व ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दीपक बागुल यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्याची सुनावणी शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे साक्षीदार, डॉक्टर, तपास अधिकारी तसेच पीडितेच्या मुलींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी विलास अंबर ठाकरे याला दोषी ठरवत जन्मठेप आणि १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील कामकाजासाठी सरकारी अभियोक्ता अॅड. स्वर्णसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. तपास व न्यायालयीन कामकाजाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
