नंदुरबार LCB ची मोठी कारवाई आंतरराज्यीय शस्त्र तस्करीचा पर्दाफाश; ७ पिस्तुले, ४६ काडतुसे जप्त, ७ आरोपी अटकेत…..
नंदुरबार || दि. ५ नोव्हेंबर २०२६ || (फिरोज खान) :- नंदुरबार जिल्ह्यात अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात गावठी बनावटीची पिस्तुले विक्रीसाठी आणणाऱ्या या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ७ गावठी पिस्तुले, ४६ जिवंत काडतुसे, चारचाकी वाहने आणि मोबाईल असा एकूण १३ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अवैध शस्त्रे, दारू, अमली पदार्थ आणि गुन्हेगारी कारवायांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा पृथ्वीराज ऊर्फ गोलू हा मध्यप्रदेशातून गावठी बनावटीची पिस्तुले आणि काडतुसे आणून महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे तसेच गुजरात राज्यात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित पृथ्वीराज ऊर्फ गोलू याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित गोलू हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट चारचाकी वाहनातून मध्यप्रदेशातून गावठी पिस्तुले घेऊन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून वाहनाची तपासणी केली.
२९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित वाहन अडवण्यात आले. यावेळी वाहनातील पृथ्वीराज ऊर्फ गोलू रणजीतसिंग जाधव आणि महेश भाईदास कोळी या दोघांची चौकशी करण्यात आली. वाहनाच्या तपासणीत २५ हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीची पिस्तूल, ६ हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे आणि ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा मुद्देमाल आढळून आला. चौकशीत या दोघांनी मध्यप्रदेशातून गावठी पिस्तुले आणून महाराष्ट्रासह गुजरातमध्ये विक्री करण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती दिली. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या टोळीचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान टोळीतील इतर सदस्य आणि शस्त्र खरेदी-विक्रीमध्ये सहभागी असलेल्या आरोपींची माहिती समोर आली.
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या पुढील कारवाईत आणखी सहा गावठी बनावटीची पिस्तुले आणि ४६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींनाही अटक करण्यात आली. या कारवाईत गोपाल ऊर्फ सागर हिरामन ठाकरे, राहुल सुरेश मोरे, लकी ऊर्फ कमलेश संजय पाटील, भूषण राजू चौधरी आणि हरीप ऊर्फ सनी कैलास चौधरी यांच्यासह एकूण सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या कारवाईत एकूण ७ गावठी बनावटीची पिस्तुले, ४६ जिवंत काडतुसे, ७ लाख रुपये किमतीची वाहने आणि १ लाख ५० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण १३ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही टोळी मध्यप्रदेशातून अवैध शस्त्रे आणून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीचे इतर फरार साथीदार आणि शस्त्र पुरवठादारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.
नंदुरबार पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आंतरराज्यीय अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा दणका बसला आहे.
